कर्मयोगी उद्योजक : जितूभाई शाह, संस्थापक-अध्यक्ष, जे. के. ग्रुप

गुजरातमधील समी हे जितूभाई यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९५७ रोजी झाला. तिथे त्याचे वडील कांतिलाल शाह है। छोटी पानटपरी चालवायचे. घरची बेताची स्थिती असल्याने जितूभाई त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण जैन बोर्डिंगमध्येच घेतले. ते शाळेत हुशार होते, पण पुढील शिक्षण घेणे त्यांना परिस्थितीमुळे अडचणीचे होऊ लागले. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्यासाठी कोल्हापूरला यायचे ठरविले. २५ नोव्हेंबर १९७६ रोजी ते महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरात आले. त्या वेळी त्यांच्या खिशात केवळ ४५ रुपये व कपड्याचे तीन जोड होते, त्यांचे हस्ताक्षर व अकौंटिंगचे ज्ञान खूप चांगले होते. त्या जोरावर त्यांनी नाथालाल हाथीभाई पेढीकडे दिवाणजीची नोकरी स्वीकारली. १९७६ ते १९८२ पर्यंत त्यांनी दिवसरात्र सचोटी व चिकाटीने काम केले. त्यांनी त्या पेढीत ध्येयाने काम केले. या पेढीमधून खूप काही शिकायला मिळाले.
याच्याच बळावर त्यांनी १९८२मध्ये स्वतःचा ‘जे. के. कॉर्पोरेशन’ या नावाने गूळ व साखर विक्रीचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला. कोणतेही मोठे भांडवल नसताना, मित्रपरिवार व पूर्वी काम केलेल्या फर्मच्या मालकांनी सहकार्य केल्याने त्यांना हा व्यवसाय करण्यास बळ मिळाले. त्या वेळी तो सुरू केलेला व्यवसाय त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. त्यांनी हा व्यवसाय तब्बल १० वर्षे चालविला. यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. नीतिमत्ता, व्यवहार व व्यापारातील उच्च शिक्षण मिळविले. १९७९ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना उप्पल, हिना आणि हेमंत अशी तीन अपत्ये झाली. पारदर्शी व्यवहार, सचोटी व अथक परिश्रमाने गूळ आणि साखर व्यवसायात त्यांनी स्वतःचे वेगळे असे नाव कमावले. दहा वर्षे वर्किंग पार्टनर म्हणून काम पाहताना जितूभाई शाह यांनी काही पथ्ये कायमपणे पाळली. प्रतिबिंब हे कधीच उकळत्या पाण्यात दिसत नाही, ते फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच दिसते, मन व विचार सैरभैर • झाल्यास आपल्याला कधी मार्ग सापडणार नाही, या उक्तीने ते शांत व एकाग्र मनाने काम करीत राहिले.

मार्केटमध्ये त्यांनी स्वतःचे ‘गुडविल’ निर्माण केले, जितूभाई शाह म्हणजे सत्य आणि विश्वासार्हता असे बाजारात समीकरण त्यांनी निर्माण केले. त्यातूनच त्यांनी पुढे स्वतःच्या उद्योगाचे साम्राज्य उभे केले. १८ एप्रिल १९९२ रोजी त्यांनी जे. के. ग्रुपची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांच्या उद्योगाचा विस्तार कोल्हापूरपासून ते पुणे, मुंबई, गुजरातपर्यंत पसरला आहे. त्याच्या दोन मुलांपैकी हेमंत शाह हा ग्रुपमधील ब्रोकिंगच्या व्यवहाराचे काम पाहतो, तर दुसरा मुलगा उप्पल हा मीडिया हाऊस व आयटी विभाग पाहतो आहे. जितूभाई हे केवळ साखरेचे व्यवहार पाहत आहेत. ते ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन, दिल्ली या संस्थेवर सहसचिव म्हणून काम पाहत आहेत. ही संस्था देशभरातील साखर कारखानदार, व्यापारी व केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचे काम करीत आहे. साखर उद्योगासंदर्भात कोणत्याही धोरणात्मक निर्णयावरून वाद निर्माण झाल्यास तो सरकारशी समन्वयाने सोडविण्याचे काम ही संस्था करते, जितूभाई शाह यांच्या ग्रुपने साखर उद्योगाची इत्थंभूत माहिती मिळावी यासाठी ‘चिनी मंडी’ नावाचे पोर्टल सुरू केले आहे. यावर जगभरातील साखर उद्योग, देशातील या उद्योगधंद्यातील वाटचाल, सरकारची धोरणे, बातम्या यांबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. पोर्टलला जगभरातील १८० देशांतून व्ह्यूअर्स मिळाले आहेत. हे पोर्टल इंग्रजी, हिंदी, गुजराती व मराठी भाषांत आहे. जितूभाई शाह यांनी आपल्या ‘जे. के. ग्रुपच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करताना सामाजिक बांधीलकीही जपली आहे. व्यवसाय सांभाळताना सामाजिक जबाबदारीचीही त्यांना व मुले उप्पल आणि हेमंत यांना जाणीव आहे. गरिबी काय असते आणि तिचे चटके बसताना कशी होरपळ होते, हे आपण अनुभवल्याचे ते सांगतात. समाजातील गरीब वर्गासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या उदात हेतूने त्यांनी १५ मार्च २०१२ रोजी ‘जे. के. शाह ट्रस्ट’ची स्थापना केली. गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेऊन प्रगती करता आली नाही. आपल्यासारखी आपल्या समाजातील कोणाचीही हेळसांड होऊ नये, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी काम सुरू केले. जैन समाजातील गरीब वर्गासाठी त्यांनी गुजरातमधील ६० कुटुंबे दत्तक घेतली आहेत. त्यांना वर्षभर लागणाऱ्या जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा संस्था अव्याहतपणे करीत आहे.

अहमदाबादमध्ये १२ वन बीएचके फ्लॅट खास गरीब वर्गासाठी घेतले आहेत. त्या ठिकाणी गरीब कुटुंबीय विनाभाडे राहत आहेत. जितूभाई शाह यांचा आणखी एक सामाजिक उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. ते ट्रस्टच्या माध्यमातून ज्येष्ठ लोकांसाठी जे जे म्हणून करता येईल, ते करीत आहेत. वयस्क, गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांसाठी त्यांनी सकाळ आणि संध्याकाळी मोफत जेवणाच्या डब्याची सेवा कोल्हापुरात सुरू केली आहे. त्याचा लाभ शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांनी वेगळे कर्मचारी नेमले आहेत. ते कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन ज्येष्ठ नागरिकास भेटून ही सेवा सुरू करतात. चार वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. त्यांनी मधल्या काळात स्वयंम शाळेलाही पाच लाखांची मदत केली. कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या प्रलयकारी महापुराच्या काळात जितूभाई शाह यांनी केलेले कार्य कोल्हापूरवासीयांच्या कायम लक्षात राहणारे ठरले. त्यांच्या ‘जे. के. ट्रस्ट’ने कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे दीडशे किट पुरविले, आंबेवाडी, चिखली परिसरातील जनावरांसाठी पशुखाद्याचा साठा पुरविला. एवढेच नव्हे, तर त्यांनी मार्केट यार्डमधील स्वतःच्या दोन गोदामांमध्ये आंबेवाडी व चिखली परिसरातील शेतकऱ्यांसाठी पूर ओसरेपर्यंत राहण्या- खाण्याची सोय केली. बाचणी (ता. करवीर) येथील पुरात वाहून जाऊन नुकसान झालेल्या केंद्रीय आश्रमशाळेस त्यांनी सर्वतोपरीने मदत केली. तेथील विद्याथ्र्यांना त्यांनी शैक्षणिक किट दिले. मुक्त सैनिक वसाहत येथील वाय. पी. पोवार विद्यालयासही त्यांनी मदत केली. महापुराच्या काळात शाह यांची टीम दिवसरात्र काम करीत होती. वेळ, काळ पाहिला जात नव्हता. रात्री जर कोणी मदतीसाठी फोन केला, तरी त्यांच्या टीममधील सहकारी तातडीने मदतीला धावून जात होते. पूरकाळात गरजू लोकांना केलेली मदत ही माझ्यासाठी आयुष्यातील सर्वांत मोठी कामगिरी आहे, असे जितूभाई सांगतात. पूर ओसरल्यानंतर गोदामामध्ये राहिलेली कुटुंबे परतताना अश्रूंना वाटा मोकळ्या करून मला आशीर्वाद देत होती, यासारखे मोठ्या पुण्याईचे कोणते काम असू शकते काय? असे सांगताना त्यांचे डोळे पाणावतात. ‘जातिधर्माच्या पलीकडे जाऊन समाजकार्य करणे म्हणजे ईश्वरकार्य असे आपण मानतो. मोठी स्वप्ने बघा आणि त्यासाठी ध्येय आणि चिकाटीने काम करा, यश मिळतेच, असे मी नेहमीच नव्या पिढीला सांगत असतो,’ असे शाह आवर्जून म्हणतात. ट्रस्टच्या माध्यमातून आपण नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतो, पण त्याचा कधी प्रचार करायला आपल्याला आवडत नाही, असे ते सांगतात.

जितूभाई शाह यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये विशेष रुची आहे. ते क्रिकेट व फुटबॉलमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सातत्याने धडपडत असतात. त्यांनी ‘रग्गेडियन लाईफस्टाईल’ ही संस्था स्थापन केली आहे. ती दरवर्षी कोल्हापुरात चार ते पाच मोठे इव्हेंट घेत असते. यामध्ये पुणे, मुंबई ते देशभरातील कानाकोपऱ्यांतून स्पर्धक येत असतात. कोल्हापुरातील फुटबॉलला बळ मिळावे व इथले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावेत, यासाठी अवॉर्डही कंपनीला मिळाला. शाह यांच्या या संस्थेने २०१८ मध्ये ‘रग्गेडियन फुटबॉल अकॅडमी’चीही स्थापना केली. सध्या ही संस्था १० ते १२ वयोगटातील फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. गतवर्षी कोल्हापूरच्या फुटबॉल संघाने गोव्यात देशपातळीवरील स्पर्धा जिंकली.

जितूभाई शाह यांच्या जे. के. ग्रुपमधील अग्रह्याह व जे. के. इन्स्टिक्ट मीडिया या कंपन्यांनी तर कोल्हापूरचे नाव जगभरात उज्ज्वल केले असे म्हणायला हरकत नाही. अग्राह टेक्नॉलॉजी व जे. के. इन्स्टिक्ट या कंपन्यांची धुरा त्यांचे पुत्र उप्पल शाह हे पाहत आहेत. उप्पल यांनी केवळ नववीपर्यंत शिक्षण घेऊन कंपनीच्या भरभराटीसाठी केलेले काम एखाद्या उच्चशिक्षितालाही लाजविणारे असेच आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काम करीत असलेली टीम गुगलसाठी असणाऱ्या असिस्टंट व ॲमेझॉनच्या अॅलेक्साच्या व्हाईस टेक्नॉलॉजीवर सातत्याने काम करीत आहे. दरवर्षी अमेरिकेत भरविल्या जाणाऱ्या गुगलच्या प्रदर्शनासाठी ते भारताचा तिरंगा झेंडा घेऊन अभिमानाने सहभागी होतात, कझाकिस्तानने त्यांच्या देशाचा इंग्रजी भाषेचा प्रश्न सोडविण्यासाठी १४८ देशांना बोलाविले होते व त्यामध्ये उप्पल यांच्या कंपनीने पहिला क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे त्या देशाने २०१७ मध्ये त्यांना पुरस्कार दिला होता. गतवर्षी (२०१८) ॲमेझॉनचा वर्ल्डवाईड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवॉर्डही कंपनीला मिळाला.
शाह यांचे ‘आवाज डॉट कॉम हे देशातील पहिले पॉडकास्ट अॅप्लिकेशन ठरले आहे. त्याची सुरुवात जानेवारी २०१९ मध्ये करण्यात आली आहे. यावर तुम्हाला गाणी सोडून सर्व काही व्हाईस स्वरूपात ऐकण्यास मिळते. तुम्हाला धार्मिक कार्यक्रम, संगीत, आरती, संतांचे साहित्य, भजन, लहान मुलांच्या आवडीची गीते, कथा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला बातम्या रेडिओ स्वरूपात ऐकण्यास त्यामध्ये समावेश आहे. मिळतात. अग्रह्याह कंपनीचे आयटीमधील काम पाहून टीसीएस कंपनीचे सर्वेसर्वा एफसी कोहली यांनी उप्पल शाह यांना बोलावून घेऊन येणाऱ्या काळात आणखी तंत्रज्ञान कसे प्रगल्भ करता येईल यावर चर्चा केली होती. भारतातील ‘गॉडफादर ऑफ आयटी’ म्हणून नावलौकिक असलेल्या कोहली यांची भेट होणे माझ्यासाठी आयुष्यातील भाग्याची गोष्ट असल्याचे उप्पल शाह अभिमानाने सांगतात. एखाद्या ग्रुपमध्ये एखादी व्यक्ती किती पदावर ताकदीने काम करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जितूभाई शाह यांचे चिरंजीव उप्पल शाह यांचे नाव घ्यावे लागेल. कार्यकारी संचालक, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, संपादक, चार्टर्ड फायनान्शिअल प्लॅनर, फाऊंडर, चीफ स्ट्रॅटेजिक प्लॅनर, मार्केटिंग प्लॅनर, रिसर्च अॅनालिस्ट अशा एकापेक्षा एक पदावर ते या ग्रुपमध्ये सक्षमपणे काम पाहत आहेत. जे. के. ग्रुपच्या वाढत चाललेल्या विस्तारात ते महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या कामगिरीचे फलित म्हणजे त्यांना राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमन अवॉर्ड, फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवॉर्ड (थायलंड), टॉप इन्फ्ल्युअन्स ॲमेझॉन एजन्सी (यूएसए) अवॉर्ड, मॅन ऑफ दि शुगर कॉन्क्लेव्ह अवॉर्ड, वेब समीट पीच अवॉर्ड (पोर्तुगाल) आउटस्टैंडिंग अचीव्हमेंट अवॉर्ड, पॉल हॅरिस फोलो (रोटरी इंटरनॅशनल) यांचा त्यामध्ये समावेश आहे.
आपल्या आई-वडिलांना दैवत मानत व त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी सुरू केलेली वाटचाल अव्याहतपणे चालू आहे. जितूभाई शाह नेहमी म्हणतात, छापा अगर काटा असो, आपले नाणे नेहमी खणखणीत पाहिजे. त्यांनी आपल्या उप्पल, हेमंत आणि हिना या मुलांवर असेच संस्कार केले. गोड व विनम्र स्वभावाने त्यांनी प्रत्येक कामात सर्वांची मने जिंकली आहेत. मग तो व्यवसाय असो की आपले कर्मचारी असोत अथवा सामाजिक कार्य, सर्व ठिकाणी त्यांनी आपली छाप पाडली आहे. आताच्या स्थितीला त्यांच्या ‘जे. के. ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यांचा ग्रुप साखर, गूळ उद्योग, आयटी, लाईफ स्टाईल मीडिया अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत एका उच्च स्थानावर झेपावला आहे, असेच म्हणायला हवे.