दैनिक ‘पुढारी’ सहयोगी पार्टनर : सुमारे १५ हजार आबालवृद्धांचा सहभाग

कोल्हापूर क्रीडा प्रतिनिधी

पहाटेचा अंधार, धुक्याने माखलेले रस्ते आणि कडाक्याच्या थंडीत ‘रगेडियन कोल्हापूर रन’ मॅरथॉन प्रतिवर्षीप्रमाणे उत्साहात झाली. सुमारे १५ हजार आबालवृद्धांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून थंडी-धुके यांची पर्वा न करता ५०, २१, १० व ५ कि.मी. अंतराच्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार केल्या. यात बालचमू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह प्रचंड होता. दिव्यांग खेळाडूंनीही ‘हम भी किसीसे कम नही…’ अशा आवेशात मॅरेथॉन पूर्ण केली. पहाटे तीन वाजल्यापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल सात तास मॅरेथॉनचा थरार सुरू होता. यामुळे अवघे शहर थबकले होते.

रविवारी पहाटे मॅरेथॉनचा प्रारंभ सेंट झेव्हियर्स हायस्कूलपासून झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर सौ. स्वाती यवलुजे व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, संजय डी.पाटील, ऋतुराज पाटील, राजवीर व तेजराज योगेश जाधव, कॉसमॉस बँकेचे सुहास गोखले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफने मॅरेथॉनची सुरुवात झाली. यावेळी संयोजक आकाश कोरगावकर,
उपल शहा, राज कोरगावकर, अमोल कोरगावकर, वृषभ शहा, जितेंद्र शहा, जयेश ओसवाल आदींची उपस्थिती होती.

• वैशिष्ट्यांनी परिपूर्ण मॅरेथॉन …

रग्गेडियन कोल्हापूर रन भारतातील सर्वात पहिली ऑन सिटी रोड अल्ट्रा मॅरेथॉन आहे. कोल्हापुरातील सर्वात मोठी मॅरेथॉन असून देश विदेशातून मोठ्या प्रमाणात यात स्पर्धक सहभागी झाले. भारतातील एकमेव मॅरेथॉन ज्यांचे सर्व पेसर हे आयर्नमॅन फिनिशर्स आहेत. कोल्हापुरात पहिल्यांदाच टाईम चीप तंत्रज्ञान, फिनिशर्स मेडल, ऑन रुट मनोरंजन, पेसरची संकल्पना, एक्स्पो, अॅम्बेसेडर संकल्पना, ऑनलाईन नोंदणी यासारख्या संकल्पना रगेडियनने आणल्या. बालचमू, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या सहभागाने मॅरेथॉन गाजली.

(Source: Pudhari)