मुरगूड : प्रतिनिधी
सध्या साखर कारखानदारी अनेक संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जे. के. ग्रुपच्या माध्यमातून साखर खरेदी-विक्रीसाठी बनवलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे साखर विक्रीत विश्वसनीयता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. साखर विक्रीतील डिजिटलायझेशन कारखानदारीला उभारी देणारे असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.

हमीदवाडा, ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर जे. के. शुगर अँड कमोडिटीज प्रा. लि. यांच्या वतीने आयोजित साखर खरेदी-विक्रीसाठी ई-टेंडरचा प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जे. के.  ग्रुपचे अध्यक्ष जितूभाई शाह, सीईओ उप्पल शाह उपस्थित होते. यावेळी उप्पल शाह म्हणाले, ई-टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून व्यापारी थेट साखर कारखान्यातून साखर खरेदी करतील, तर कारखानदारांनाही त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. तसेच व्यापाऱ्यांना साखर जागी पोहोच करण्याची हमी मिळते.

प्रास्ताविक नीलेश पिंजरकर यांनी केले. एमडी हेमंत शाह यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. जे. के. ग्रुपचे प्रमुख जितूभाई शाह यांचा खासदार मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘सदासाखर’ चे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे, भोगावती, जवाहर आदी कारखान्याचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Source: http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_KOL_20230702_08_13