कोणाचा साथीदार नाही…. कोणाची मुले परदेशात आहेत, तर कोणाला त्यांच्याच मुलांनी घराबाहेर काढले आहे… कोणी गळक्या पत्राच्या शेडमध्ये वास्तवास, तर कोणी एका छोट्याशा खोलीत मरणयातना सोसतेय …. अशा घरच्यांनी परके केलेल्या किंवा गरिबी, शारीरिक दुर्बलतेमुळे दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या वृद्धांसाठी जे. के. चॅरिटेबल ट्रस्ट, उत्तरेश्वर थाळी, रॉबीनहूड आर्मी यासारख्या स्वयंसेवी संस्था कसलाही गाजावाजा न करता अव्याहतपणे मदतीचा हात देत आहेत. या संस्था ज्येष्ठांना मायेचा घास भरवताहेत. अशा स्वयंसेवी संस्था आणि लोकांमुळे ज्येष्ठांच्या आयुष्याचा ‘उत्तरार्ध काहीसा आनंदी झाला आहे.
जे. के. चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्याला या अन्नाची खरी गरज आहे, त्यांचा सर्व्हे केला जातो. ती व्यक्ती खरेच गरजू आणि असहाय्य आहे, याची खात्री केल्यानंतरच त्यांना डबा सुरू केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून अव्याहतपणे हा उपक्रम शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवला जात आहे.
डबे गरजूंना पोहोचवण्यासाठी ४ ते ५ दुचाकी वाहने आणि पगारी मुले संस्थेने नियुक्त केली आहेत. त्यांच्याकडून सकाळी ११ आणि सायंकाळी ७ वाजता घरपोच डबे देण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. दोन भाज्या, वरण, आमटी, भात, कोशिंबीर, असा सकस आहार डब्यातून घरपोच दिला जातो.
दर दोन महिन्यांनी या उपक्रमाबाबत डबे पोहोचवल्या जाणाऱ्या ज्येष्ठांकडून अभिप्राय घेतले जातात. घरपोच अर्ज देऊन त्यावर त्यांची मते, सूचना, मागणी याचा विचार घेतला जातो. या उपक्रमासाठी लागणारा खर्च ट्रस्टमार्फत उचलण्यात येत असून, या माध्यमातून समाजातील ज्येष्ठांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला जात आहे.