करोना विषाणू संसर्गाची धास्ती असताना अशा रुग्णांचे उपचार डॉक्टर, नर्सेस व संबंधित स्टाफ मोठ्या धाडसाने करीत आहे. या रुग्णांवर उपचार करताना पीपीई कीट वापरणे अनिवार्य असून बऱ्याच ठिकाणी अजूनही पीपीई कीटची आवश्यकता आहे. त्यामुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफला या करोनाविरोधातील लढाईत जास्तीत जास्त सुरक्षा देण्यासाठी जेके चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी महापुरावेळी हजारो लोकांना निवारा व सर्व सुविधा, जेष्ठ नागरिकांना रोज २ वेळचे घरपोच जेवण, गरजू आणि वंचितांना मदतीचा हाथ देण्यात जेके ट्रस्ट अग्रेसर राहिला.अनेक सामाजिक कार्यात व नैसर्गिक आपत्तीवेळी कोल्हापूरवासियांची मदत करण्यात कायम अग्रेसर असणाऱ्या जेके चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने १०० पीपीई कीट जेके ट्रस्टचे अध्यक्ष जितूभाई शहा यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिसप्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख, महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अमित मित्तल यांच्यासह उप्पल शहा, हेमंत शहा, जयेश ओसवाल, सचिन झंवर, प्रतिक चौगुले आदी उपस्थित होते. भविष्यात आणखी काही मदत केली जाईल असे उप्पल व हेमंत शहा यांनी सांगितले.