दलत्या काळानुसार संयुक्त कुटुंब पद्धतीची जागा नॅनो कुटुब व्यवस्थेने आक्रमित केली आहे. यामुळे आधुनिक कुटुंबव्यवस्थेतील नातवंडे आजी, आजोबांच्या मायेला मुकले आहेत. अनेक निराधार वृद्ध शारीरिक,मानसिक, आर्थिक आणि अन्य समस्यांनी ग्रस्त जीवन जगत आहेत. वृद्धांच्या आजारपणामुळे आहारापेक्षा औषधावर जास्त खर्च होतो. त्यामुळे त्यांचा आहाराबाबत निष्काळजीपणा होतो. औषधांचा खर्च टाळणे शक्य होत नाही. त्यामुळे औषधोपचारास प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे उपासमार सहन करावी लागते.शारीरिक दुर्बलता, निराधार एकाकीपणा, गरिबी यामुळे काहींना डॉ. आहारासाठी पुरेसे पैसे असत नाहीत.
अशा निराधारांची जेवणाची व्यवस्था होणे आवश्यक आहे. शारीरिक दुर्बलतेमुळे घरांत स्वयंपाक करणे शक्य होत नाही. त्या शिवाय बाजारातून किराणा, भाजीपाला आदी वस्तू आणणे जमत नाही. ही अडचण कोल्हापुरातील जे. के. शाह चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माँ समोरन सेवाधाम या स्वयंसेवी संस्थेने ओळखली आणि गरीब व निराधार वृध्दांना सकाळ संध्याकाळचा टिफीन घरपोच देण्याची व्यवस्था या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष जितूभाई शहा यांनी स्वीकारली. सध्या सकाळी व संध्याकाळी वृध्दांच्या घरी डबे पोहोचविले जात आहेत. ही सेवा २०१६ पासून अव्याहत सुरू आहे. सकाळी ११ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता डबे पोहचवले जातात. या दोन वर्षांत डबा मिळाला नाही, अशी एकही तक्रार नाही. उपक्रमाचे नियोजन व व्यवस्था उप्पल शहा व हेमंत शहा पाहतात. तसेच सुनील बोडके त्यांना मदत करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबतच्या अडचणींची माहिती देतात. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वृध्दाश्रमांना भेट व देणगी दिली जात आहे.
तसेच अनाथ विद्यार्थीना मदत केली जाते लाभार्थी व्यक्ती, वृध्द, गरीब, एकाकी, हतबल आहे व त्यांना खरेच टिफीनची गरज आहे. याबाबत सेवाधामचे वतीने खात्री केली जाते. सेवाधामचे प्रतिनिधी सुनील बोडके या वृध्दांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी करून गरजेनुसार त्या वृध्दास डबा पाठविण्याबद्दल सुचवतात. जेवणाच्या डब्यात चपाती, भाजी, आमटी, भात, कोशींबीर, लोणचे, चटणी आदी पदार्थ असतात. रविवारी सकाळी एक वेळ डबा दिला जातो. त्या दिवशी एक स्वीट डिश दिली जाते. रविवार संध्याकाळसाठी चिवडा / भडंग आदी पदार्थ दिले जातात. संस्थेच्यावतीने गरजू वृध्दांकडून जेवण वेळेवर मिळण्याबद्दल, चव आणि पुरेशा जेवणाबाबत वर्षातून चार वेळा अभिप्राय घेतला जातो. संस्थेचा प्रतिनिधी वर्षातून दोनदा या वृध्दांची भेट घेतो. डब्याशिवाय इतर समस्यांबद्दल चौकशी केली जाते. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.जेवण तयार करणे व वाटप करण्याची व्यवस्था प्रविण रानडे व त्यांच्या पत्नी श्री योगी पाहत असत. प्रविण यांचे तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे श्रीमती श्रीयोगी यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली. या परिस्थितीतही एका गरीब कुटुंबास उद्योग व आधार द्यावा, असा सेवाधामचा उद्देश आहे. श्रीमती श्रीयोगी रानडे जेवणाची व्यवस्था पाहत आहेत. श्रीमती श्रीयोगी रानडे यांना लहान मुलगा, सासू व सासरे असा परिवार आहे.
आमची उपासमार होत होती. पुरेसे जेवण मिळत नव्हते. परंतु आता दोन वेळचे जेवण वेळेवर, पुरेसे आणि चवदार जेवण शहा यांच्यामुळे मिळते.अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांकडून राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाकडे येत आहेत. कोल्हापूर शहरात १ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी गरीब गरजू, निराधार, एकाकी वृद्धांना किमान दोन वेळचे जेवण मोफत द्यावे, असा सेवाधामचा हेतू आहे. सेवाधामच्या उपक्रमाची माहिती राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंगराव जगताप यांना मिळाली. या सेवा संघाच्या सर्व सभासदांमार्फत ही माहिती कोल्हापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली आहे. ज्यांना गरीब, गरजू, निराधारांना टिफीन द्यायचे असेल, त्यांनी डॉ. मानसिंगराव जगताप (अध्यक्ष, राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मोबाईल – ९४२२४२५६६९/८८०५२३५४७६) यांच्याशी संपर्क साधावा.