म्हाकवे, ता. १ : साखर कारखानदारी अनेक संकटांतून जात आहे. अशा परिस्थितीत जे. के. ग्रुपने साखर खरेदी-विक्रीसाठी बनविलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे साखर विक्रीत विश्वसनीयता आणि पारदर्शकता येईल. साखर- विक्रीतील डिजिटलायजेशन कारखानदारीला उभारी देणारे आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर जे. के. शुगर अँन्ड कोमोडीटेन्स प्रा. लि. यांच्यातर्फे आयोजित साखर खरेदी-विक्रीसाठी ई टेंडरचा प्रारंभ केला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जे. के. ग्रुपचे अध्यक्ष जितूभाई शाह, सीईओ उप्पल शाह उपस्थित होते.

उप्पल शाह म्हणाले, “ई-टेंडर प्रक्रियेच्या माध्यमातून व्यापारी थेट साखर कारखान्यातून साखर खरेदी करतील, तर कारखानादारांनाही त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. तसेच व्यापाऱ्यांना साखर जागा पोहोच करण्याची हमी मिळते.” नीलेश पिंजरकर यांनी प्रास्ताविक केले. एमडी हेमंत शाह यांनी माहिती दिली. जे. के. ग्रुपचे प्रमुख जितूभाई शाह यांचा खासदार मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे, भोगावती, जवाहर साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.