‘माणुसकी’ या शब्दाची सीमा आपण दिवसेंदिवस स्वतःच संकुचित करीत आहोत. आपली माणुसकी आपल्यापुरती मर्यादित ठेवण्यासाठी आपली सारी धडपड सुरू आहे. अशा ‘लिमिटेड’ माणुसकी जपण्याच्या स्पर्धेतही जे. के. शाह चॅरिटेबल ट्रस्ट ज्येष्ठांना मोफत जेवणाचे डबे देऊन माणुसकीचे आणि दातृत्वाचे दर्शन घडवीत आहे.
घरच्यांनी परके केल्याने, दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या शहरातील सुमारे ५० ज्येष्ठांना तीन वर्षांपासून जे के. शाह चॅरिटेबल ट्रस्ट मोफत जेवणाचे डबे पुरवून आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय पदोपदी जाणवून देत आहे.
आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रस्टचे अध्यक्ष जितुभाई शाह यांनी हा उपक्रम सुरू केला. कोणताही गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धीमागे न लागता, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गरजू ज्येष्ठांना शोधून काढून त्यांना ते दोनवेळचे मोफत, सकस जेवणाचे डबे पुरवितात. शाह यांच्यासारख्या
आणखी काहींनी पुढाकार घेतला तर समाजातील दुःख हलके होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.
असा चालतो उपक्रम
• ट्रस्टतर्फे २०१६ पासून या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमासाठी एक विशेष पथक नियुक्त केले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे पथक पाहणी करून गरजू आणि निराधार ज्येष्ठांची यादी तयार करते.
• त्यानंतर त्यांची भेट घेऊन आपल्या उपक्रमांची सविस्तर माहिती देते. आपण ज्येष्ठांवर कोणत्याही प्रकारचे उपकार करीत नाही, ही भावना जागृत करून त्यांना मोफत जेवणाचे डबे पुरविले जातात.
• ट्रस्टचे संचालक उप्पेल शाह व हेमंत शाह यांच्यामार्फत दर तीन महिन्यांनी या ज्येष्ठांकडून जेवणाच्या दर्जाबाबत विचारणा केली जाते.
• सकाळी ११ व सायंकाळी ७.३० वाजता ज्येष्ठांसाठी घरपोच डबे पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी उपयुक्त पालेभाज्या, कडधान्ये, चपाती, एखादा गोड जातो.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला. पहिल्यांदा दोन-तीन ज्येष्ठांना आम्ही डबे पुरवीत होतो. त्यानंतर यामध्ये वाढ होत आता तब्बल ५० डबे पुरविले जातात. हा उपक्रम नसून ही आमची जबाबदारी आहे.
– जितू शाह, अध्यक्ष, जे. के. ट्रस्ट आमच्या वडिलांनी गरिबी जवळून पाहिली आहे. आपल्यामुळे एखाद्या निराधार व्यक्तीच्या
आयुष्यातील दुःख थोड़े हलके झाले तर त्यासारखा दुसरा आनंद नाही, याच भावनेने मी आणि माझा भाऊ हेमंत आम्ही वडिलांच्या उपक्रमासाठी हातभार लावीत आहोत.
उप्पल शाह, संचालक, जे. के. शाह ट्रस्ट